आमच्याबद्दल
आमचा प्रवास
सुरुवातीस अनेक प्रकारच्या अडचणी समोर आल्या त्यामध्ये महत्वाचा प्रश्न हा आर्थिक होता. कीर्तन व समाजप्रबोधनातून यावर बऱ्यापैकी मात करण्यात यश आले. सहकारी नाममात्र मानधनावर काम करण्यास तयार झाले. आनंदी स्वभाव व प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे समाजामध्ये अनेक जिवलग मित्रांची साखळी तयार झालेली होती. प्रत्येकाने यामध्ये खारीचा वाटा उचलला व पाहता पाहता आज नऊ वर्षे झाली.
अनेक व्यसनी रुग्णमित्रांना व त्यांच्या कुटुंबियांना लाभ झालेला आहे आणि भविष्यातही होत राहील.
या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाने महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने २०१५-१६ गोंदिया या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेसाहेब, मा. ना. दिलीप कांबळे, मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये गौरवण्यात आले. या प्रकारामुळे याठिकाणी कार्य करणाऱ्या साथीदारांचा उत्साह द्विगुणित होण्यास मदत झाली व नंतर केंद्राकडे प्रकल्प सादर केल्यानंतर शासनाकडून मान्यता मिळाली.
मध्यंतराच्या काळामध्ये धीरज (महाराज) शर्मा नावाचे रत्न हरपल्याने या ठिकाणी एक प्रकारचा दुःखाचा डोंगर कोसळला व त्यानंतर त्यांनी पाहिलेल्या स्वप्नाखातर त्यांचे वडील, पत्नी व सहकारी यांनी संस्था व्यवस्थित सुरूच ठेवली व पाऊण तपाची पूर्तता झाली.
अशाच समाजोपयोगी कार्याची प्रेरणा घेऊन प्रत्येकानेच समाजासाठी आपले अत्यल्प प्रमाणावर कार्य करावे हीच अपेक्षा. व लवकरात लवकर व्यसन नावाच्या किडीपासून समाज मुक्त व्हावा हि श्री गुरु दत्तचरणी प्रार्थना.
